Shimla Sanjauli Masjid Protest : शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बेकायदेशीर संजौली मशिदी प्रकरणावरून आज (दि.११) हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हिंदू संघटना बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी करत आहेत. यावरून आता मोठा तणाव निर्माण झाला आहे.
शिमला येथील संजौली येथील मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात बुधवारी हिंदू संघटनांनी मोठे आंदोलन केले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी संजौली ते ढली हा रस्ता बंद केला. मात्र, यावेळी आंदोलकांचा विरोध वाढला. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिमला पोलिसांनी संजौली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ११ वाजता आंदोलनाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी काही संजौलीतील दुकानं व इतर लोकांना हटवले. यादरम्यान, हिंदू नेते कमल गौतम संजौली चौकात पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना त्यांच्या समर्थकांसह ताब्यात घेतले.
यानंतर पोलिसांनी ढली बाजूचे दोन्ही बोगदे बंद केल्यावर आंदोलकांनी ढली भाजी मंडईत रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. यानंतर आंदोलक येथून पुढे सरसावले आणि नंतर बॅरिकेड्स तोडले. आंदोलक पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे सरसावले. मात्र, यादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा वापर केला.
संजौलीतील आंदोलक मशिदीपासून काही अंतरावर पोहोचले. त्यावेळी, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तसेच, वॉटर कॅननचाही वापर करण्यात आला आहे. मात्र, लोक पाण्यापासून बचाव करण्यासाठी छत्र्या घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत. जमाव नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे. सुरुवातील जवळपास १००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलकांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले.
दुसरीकडे, कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले की, लोकांनी शांततेने आंदोलन करावे. कायदा आपले काम करत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हा अस्मितेचा लढा आहे आणि त्यामुळेच संजौलीतील सर्व लोक येथे आले आहेत. हा हिंदू-मुस्लिम वाद नाही, असे आंदोलकांमधील एका व्यक्तीने सांगितले. तर आम्ही शांततेने आंदोलन करत होतो. आम्हाला शांततेने आंदोलन करण्याची परवानगी द्यायला हवी होती, असे आणखी एका आंदोलकाने सांगितले.