संजय दत्तला तुरुंगातून पुन्हा एक महिन्याची रजा
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM
मुलीवर उपचाराचे कारण : विभागीय आयुक्तांनी केला अर्ज मंजूर
मुलीवर उपचाराचे कारण : विभागीय आयुक्तांनी केला अर्ज मंजूरपुणे : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांची संचित रजा (पॅरोल) मंजूर केली आहे. त्याने मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी जूनमध्ये विभागीय आयुक्तांकडे रजेसाठी अर्ज केला होता. रजा मंजुर होताच बुधवारी दुपारी त्याला कारागृहामधून सोडण्यात आल्याची माहिती अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी दोन दिवसांपूर्वी संजयची रजा मंजूर केली. ही संचित रजा ६० दिवसांपर्यंत वाढवता येऊ शकते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मे २०१३मध्ये संजय दत्तची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याने आतापर्यंत एकूण १४६ दिवसांची रजा भोगलेली आहे. ऑक्टोबर २०१३मध्ये त्याला फर्लो मंजूर करण्यात आली होती. ती पुढे १४ दिवस वाढवूनही देण्यात आली होती.यासोबतच जानेवारी २०१४मध्ये त्याला ३० दिवसांची संचित रजा मंजूर झाली. ही रजाही ६० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०१४मध्ये पुन्हा १४ दिवसांची फर्लो मंजूर करण्यात आली होती. त्याने ही रजा वाढवून मिळण्यासाठी शासनदरबारी खूप प्रयत्न केले. परंतु, सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागले होते. तो कारागृहात सध्या कापडी पिशव्या बनवण्याचे काम करीत आहे. बुधवारी त्याच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्याला बाहेर सोडण्यात आल्याचे अधीक्षक पवार यांनी सांगितले.