ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 3 - बॉलिवूडमधील 'खलनायक' संजय दत्तच्या बॉडीगार्ड्सनी पत्रकारांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 5 पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत. ताजनगरी आग्रा येथे संजय दत्त आपला आगामी सिनेमा 'भूमी'चे शुटिंग करत आहे. यादरम्यान ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त सिनेमातील स्टार कास्टसहीत गेल्या काही दिवसांपासून आग्रामध्ये 'भूमी' सिनेमाचे शुटिंग करत आहेत. यावेळी ताजमहलपासून काही अंतरावर असलेल्या व्हीव्हीआयपी रोडवर सिनेमाचे चित्रिकरण सुरू होते. यामुळे त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या समस्येमुळे देश-परदेशातून आलेल्या पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना संजय दत्तच्या सांगण्यावरुन त्याच्या बॉडीगार्ड्सनं मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेत 5 पत्रकार जखमी झाले आहेत. पत्रकारांना झालेल्या मारहाणीविरोधात स्थानिकांनीही तीव्र निषेध नोंदवला आहे. विशेष म्हणजे पत्रकार मारहाणीची घटना कॅमे-यात कैद झाली आहे.
या मारहाणीप्रकरणी पत्रकारांनी ताजगंज पोलिसात संजय दत्त आणि त्याच्या बॉडीगार्ड्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. संजय दत्तच्या बॉडीगार्ड्ससोबत पोलिसांनीही मीडियासोबत असभ्यतेचे वर्तन केले, असा आरोपही पत्रकारांनी केला आहे.
पत्रकार अजय कुमार यांनी सांगितले की, 'मी केवळ वृत्तांकनासाठी गेलो होतो. यावेळी संजय दत्तच्या बॉडीगार्ड्सने माझ्यावर हात उगारला आणि काठ्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे मला डोकं आणि छातीवर गंभीर दुखापत झाली आहे'.दरम्यान, या घटनेनंतर संजय दत्तने पत्रकारांची माफी मागितली आहे.
Agra: Scuffle between Sanjay Dutt's bodyguards and reporters during shooting of film 'Bhoomi'. pic.twitter.com/VqrRUW8bUd— ANI UP (@ANINewsUP) March 3, 2017