श्रीनगर - जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजीव गांधींबाबत केलेल्या विधानावरुन काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं असा टोला काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सत्यपाल मलिक यांना लगावला आहे.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, सुरुवातीच्या काळात राजीव गांधी भ्रष्ट नव्हते मात्र काही लोकांच्या प्रभावात येऊन ते भ्रष्टाचारी झाले आणि बोफार्स घोटाळा केला. मलिक यांचा कथित ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल होत होता त्यामध्ये राजीव गांधी भ्रष्ट नाहीत असं बोललं जातं होतं. मात्र या ऑडिओ क्लीपवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्टीकरण देताना हे वक्तव्य केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरून आयोजित सभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर वैयक्तीक टॅक्सप्रमाणे केला होता, असा आरोप केला होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले असून राजीव गांधी यांचे त्यावेळचे मित्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सत्य समोर आणावे असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं.
तर राहुल गांधी यांनीही . 'तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचं आहे. राजीव गांधींबद्दल बोलायचं आहे. अगदी बिनधास्त बोला. पण राफेल प्रकरणात काय झालं, काय नाही झालं हेदेखील जनतेला सांगा,' असं आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं होतं. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी वारंवार राजीव गांधींवर टीका करत आहेत
दरम्यान राजीव गांधी यांच्यावरुन होणाऱ्या राजकारणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही भाष्य केलं होतं. गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले होते.