मुंबई - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रविवारी शिवसेनाखासदारसंजय राऊत यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी ईडीचे १० अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी पोहचले. यावेळी CISF जवानही सुरक्षेसाठी तैनात होते. सकाळी ७ वाजल्यापासून राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. त्यानंतर दुपारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं गेले. सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर, सोशल मीडियासह राजकीय नेत्यांनीही या कारवाईविरुद्ध मत व्यक्त केले. तर, शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे. आता, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसंद सभागृहाबाहेर फलकबाजी करुन भाजपवर निशाणा साधला.
संजय राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. तर, संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनातही संजय राऊतांवरील कारवाईसह, महागाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेविरुद्ध आवाज उठवत आहेत. राज्यसभा खसदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद सभागृहाबाहेर हातात बॅनर घेऊन भाजप आणि ईडीवर निशाणा साधला. ED म्हणजे Exteded Department of BJP. म्हणजेच, ईडी हा भाजपचा विस्तारीत विभाग म्हणून काम करत असल्याची टिका चतुर्वेदी यांनी केली आहे.
महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघ असलेल्या कुडाळमध्ये आदित्य ठाकरे दाखल झाले आहेत. यानंतर ते वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान १ आणि २ ऑगस्ट रोजी ही 'शिव संवाद' यात्रा निघणार आहे.