सिल्वासा-
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक लागली आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत दादरा नगर हवेलीच्या दौऱ्यावर आहेत. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "रेल्वेमंत्री इथं प्रचाराला येत आहेत. इतर मंत्रीही येतील. हवं तर ज्यो बायडन यांना प्रचाराला बोलवा. शिवसेना कुणाला घाबरत नाही", असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत रेल्वे मंत्री तळ ठोकून बसले आहेत. रेल्वे विकून टाकली त्यामुळं रेल्वेमंत्री दादरा नगर हवेलीत आले आहेत. इथं इतरही मंत्री येतील. बंगालमध्येही गेले होते. तिथं त्यांचं काय झालं. भाजपनं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला ज्यो बायडन यांना आणावं, आम्ही कुणाला घाबरत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिलं. येथील व्यवस्थेनं मोहनभाई यांच्या सारख्या तेज तर्रार नेत्याचा जीव घेतला. अभिनव यांना पाहिल्यावर मोहन डेलकर यांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणाले. सिल्वासा आणि दादरा नगर हवेलीला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही, असंही ते म्हणाले.