नवी दिल्ली - आमच्यासारख्या खासदार, मंत्र्यांनाही सीआरपीएफनं विमानतळावर थांबवलं आहे मग या ३ लोकांना ज्यांनी अनेकदा मुल्ला मौलवींची वेशांतर करून जात होते. खोटे पॅनकार्ड, खोटे आधारकार्ड बनवले गेले. या लोकांना सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी दिल्लीतल्या गृहमंत्रालयाकडून सूचना दिल्याच असाव्यात. या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील या कटात सहभागी असू शकतात, ते काय करत होते?, मुंबई, दिल्ली विमानतळावरील सुरक्षा धोक्यात आली आहे मग या जेम्स बोन्डच्या दंतकथा आम्ही ऐकतो ते काय करत होते असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्लीत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात बारामतीचे नवे विष्णूदास आहेत, कारण विष्णूचे १३ वे अवतार दिल्लीत आहेत. त्यांची नाट्यकला समोर आली आहे. पडद्यामागची पटकथाही हळूहळू बाहेर येईल. महाराष्ट्रातील जनतेने याचा आनंद घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी मौलवीचा वेश धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता. अनेक वेशांतरे केले होते. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून फिरतायेत हे सगळे हरूण अल रशीदची पोरं आहेत. हरुण अल रशीद अशी वेशांतर करून फिरायचा असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
तसेच राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात येऊ शकते याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी देशाला दाखवून दिलंय. राज्यात मंत्रिमंडळ नसून नाट्यमंडळ आहे. रंगभूमीला फार मोठी परंपरा आहे. मात्र हा जो काही प्रकार सुरू आहे तो देशाला, महाराष्ट्राला घातक आहे. तुम्ही खोटी नावे, खोटी कागदपत्रे, वेशांतर करून मुंबई, दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करता, सीआरपीएफची जबाबदारी अमित शाहांच्या हातात आहे. याचा अर्थ शाहांनी या लोकांना सोडावं असं सांगितले होते. दाऊद, नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहल चौकसी, टायगर मेमन यांना आजपर्यंत असं सोडलंय का? हा चिंतेचा विषय आहे असं सांगत संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शाहांवर प्रश्नचिन्ह उभे केले.
दरम्यान, मातोश्रीबाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं हे भाजपाचं कटकारस्थान आहे. त्याला फडणवीस टच असं म्हणतात. जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख, शांतता लाभणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असं सांगत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.