"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपा प्रवक्त्याचं प्रत्युत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 05:35 PM2023-02-19T17:35:36+5:302023-02-19T17:37:16+5:30
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली-
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण चोरण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजपाचे नेते आणि प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊत हे आता महाराष्ट्राचे राहुल गांधी बनले आहेत. त्यांच्या आरोपांना कुणीच भीक घालत नाही, असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांना जनता गांभीर्यानं घेत नाही. संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन संजय राऊत हे राहुल गांधी यांचीच भाषा बोलू लागले आहेत, असं भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले.
"राजकीय निराशा लपवायची आहे, ठाकरे कुटुंबाला वाचवायचं आहे, त्यामुळेच निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं जात आहे. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केलेला आरोप बेताल आणि हास्यास्पद आहे. आज महाराष्ट्रात संजय राऊत, उद्धव सेना आणि त्यांच्या नेत्यांना कुणीही राजकीयदृष्ट्या गांभीर्याने घेत नाही. त्यांच्याकडे फारसे राजकीय वर्चस्व राहिलेले नाही. निवडणूक आयोगाचा आदेश तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. मात्र संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून उद्धव सेना काँग्रेस आणि राहुल गांधींसारखंच वागत आहे", असं शहजाद पूनावाला म्हणाले.
Sanjay Raut has now become the Rahul Gandhi of Maharashtra & has reduced Uddhav Sena to a Congress style party that abuses & insults Babasaheb Ambedkar’s Constitutional institutions like ECI by making scurrilous allegations when the verdict goes against them! Shameful pic.twitter.com/XLI4ON2qQm
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) February 19, 2023
राऊत यांच्या विधानावर पूनावाला यांनी जोरदार टीका केली. "संजय राऊत आज राहुल गांधींची भाषा बोलू लागले आहेत. निवडणूक हरल्यावर ते निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतात. खटला हरल्यावर ते सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित करतात. ते इतर संस्थांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी केवळ निवडणूक चिन्ह गमावलेलं नाही तर बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधाराही गमावली आहे", असं पूनावाला म्हणाले.
#WATCH शिवसेना और उसका निशान (तीर-कमान) चिह्न छीना गया है और ऐसा करने के लिए इस मामले में अब तक 2,000 करोड़ रुपए की लेनदेन हुई है: उद्धव ठाकरे गुट के नेता व सांसद संजय राउत, मुंबई pic.twitter.com/6hyQHLjMZr
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2023
संजय राऊतांनी केलाय गंभीर आरोप
"धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले", असं म्हणत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असाही इशारा राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..." असं राऊत यांनी म्हटलं आहे.