"खासदार सारंगींना ओळखतो, त्यांची पार्श्वभूमी..."; संसदेतल्या राड्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:00 IST2024-12-20T10:47:24+5:302024-12-20T11:00:31+5:30
संसदेत विरोधी पक्षांचे खासदार आणि एनडीएचे खासदारांमध्ये झालेल्या राड्यावरुन संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"खासदार सारंगींना ओळखतो, त्यांची पार्श्वभूमी..."; संसदेतल्या राड्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Parliament Scuffle : संसद भवनाच्या परिसरात गुरुवारी इंडिया आघाडीच्या खासदारांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला ढकलून दिल्याचा आरोप केला. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या नौटंकीसाठी यांना पुरस्कार द्यायला हवा असं संजय राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन संसदेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. अमित शाह यांच्या विधानविरोधात आंदोलन सुरु असताना विरोधी पक्षांचे खासदार आणि एनडीएचे खासदार आपापसात भिडले. यावेळी खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांना विरोधी पक्षांच्या खासदारांनी ढकलून दिल्यामुळे ते जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला. राहुल गांधींनी माझ्या अंगावर एका खासदराला ढकलले ज्यामुळे ते खाली पडले, असं सारंगी यांनी म्हटलं. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
"आता सरकार आणि सत्ता त्यांची आहे. मी काल राहुल गांधी यांच्यासोबत होतो. त्यानंतर आम्ही सगळे संसदेत निघून गेलो. त्यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी इंडिया आघाडीचे सगळे सदस्य तिथे होते. हे जे खासदार सारंगी आहेत त्यांना मी ओळखतो. त्यांची एकदा पार्श्वभूमी एकदा पाहा. अशी नौटंकी करण्यात ते पहिल्या क्रमांकावर आहेत. यांना पुरस्कार मिळायला हवा. भाजप नाट्यशाळा आहे. यांचे नाटक बंद होणार आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, संसदेतल्या वादावरुन राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती आणि खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासाठी बीएनएसचे कलम १०९ काढून टाकले आहे. भाजप नेत्यांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०९,११५,११७, १२५,१३१ आणि ३५१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची विनंती केली होती. यापैकी पोलिसांनी कलम १०९ हटवले असून उर्वरित कलमांमध्ये एफआयआर नोंदवला आहे. वेगवेगळ्या आरोपांमुळे ही सर्व कलमे लावण्यात आली आहेत.