असदुद्दीन ओवेसींचे राहुल गांधींना आव्हान; संजय राऊत म्हणतात- 'नरेंद्र मोदींना आव्हान द्या...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:59 PM2023-09-25T14:59:48+5:302023-09-25T15:00:11+5:30
असदुद्दीन ओवेसींच्या आव्हानाला संजय राऊतांनी दिले प्रत्युत्तर.
Sanjay Raut Reaction: हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक हैदराबादमधून लढवण्याचे आव्हान दिले आहे. यावर राहुल गांधींकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, पण शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओवेसींच्या आव्हानाला संजय राऊत म्हणाले की, "ओवेसींनी राहुल गांधींना नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हैद्राबादमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान द्यावे. राहुल गांधींची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, त्यांनी देशात कुठेही निवडणूक लढवली तर ते जिंकतील. ओवेसींनी सर्व गोष्टी समजून आव्हान दिले पाहिजे," अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
#WATCH | Hyderabad, Telangana: AIMIM chief Asaduddin Owaisi says "I am challenging your leader (Rahul Gandhi) to contest elections from Hyderabad and not Wayanad. You keep giving big statements, come to the ground and fight against me. People from Congress will say a lot of… pic.twitter.com/TXANRLWtjJ
— ANI (@ANI) September 24, 2023
काय म्हणाले होते ओवेसी ?
असदुद्दीन ओवेसी आपल्या लोकसभा मतदारसंघात एका सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, “देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या राजवटीत यूपीमधील वादग्रस्त संरचना उद्ध्वस्त करण्यात आली. मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) वायनाडमधून नाही तर हैदराबादमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान देतो. मोठमोठी विधाने करू नका, मैदानात या आणि माझ्याविरुद्ध लढा, मी तयार आहे," असे आव्हान ओवेसींनी दिले होते.
राहुल गांधींची टीका
राहुल गांधी तेलंगणातील एका सभेत बोलताना म्हणाले होते, तेलंगणात BRS, BJP आणि AIMIM सोबत लढत आहे. ते स्वत:ला वेगवेगळे पक्ष म्हणतील पण काम एकजुटीने करतात. त्यांनी असा दावाही केला होता की, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात कोणतीही सीबीआय आणि ईडी चौकशी सुरू नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आपले मानतात.