Sanjay Raut, No Muslim Minister in PM Modi NDA Cabinet: भाजपप्रणित NDA सरकारचा रविवारी शपथविधी झाला. नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह ३० कॅबिनेट, पाच स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. पण महत्त्वाची बाब म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात एकाही एकाही मुस्लीम चेहऱ्याला स्थान मिळालेले नाही. गेल्या मंत्रिमंडळात असलेले मुख्तार अब्बास नक्वी यांची राज्यसभेवर पुन्हा निवड न झाल्याने मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या एकही मुस्लीममंत्री नाही. या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
"निवडणुकीच्या प्रचार सभांमध्येच मोदींनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली होती. त्यांना देशात हिंदू-मुस्लीम भेद करायचा आहे. मोदींना असे वाटते की मुस्लिमांनी त्यांना मतं दिलेली नाहीत म्हणून त्यांना मंत्री केलं नाही. ही गोष्ट संविधानाच्या विरोधात आहे. आम्ही आधीपासून सांगतो होतो त्याप्रमाणे हे सरकार संविधानाच्या विरोधात काम करत आहे. पण माझं असं मत आहे की पंतप्रधान हे सर्व जाती-धर्माचे असतात, एखाद्या विशिष्ट जातीचे नसतात. आता आम्ही विचारतो की चंद्राबाबू - नितीश यांना हे मंजूर आहे का? मोदींनी मंत्री केलं नाही तर नितीश-चंद्राबाबूंनी त्यांच्या कोट्यातून एखादा मुस्लीम मंत्री का नाही बनवला? ते देखील भाजपाच्या दबावाखाली आहेत का?" अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी केली.
"इतकी वर्षे मोदींच्या सरकारने केवळ आश्वासने दिली. काहीही काम केले नाही. आता NDAची सरकार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनी जर भाजपाला पाठिंबा दिला नसता तर मोदी पुन्हा पंतप्रधान बनलेच नसते. त्यामुळे आता सरकारमध्ये जे काही चुकीचं घडेल त्यासाठी आम्ही नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूना प्रश्न विचारणार आहोत. कारण त्यांच्यामुळेच हे उधारीचे सरकार सुरु आहे," असेही राऊत म्हणाले.