सोमवारपासून सुरू झालेल्या अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. या शपथविधीदरम्यान, काही घटनांमुळे वादविवादही झाले होते. त्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन झाल्यावर जय भीम, जय तेलंगाणा आणि जय पॅलेस्टाईन, अशी घोषणा दिली होती. ओवेसी यांच्या कृतीवर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच ओवेसींचं संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र असदुद्दीन ओवेसी यांचा बचाव केला आहे. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना असदुद्दीन ओवेसी यांनी सदस्यत्वाची शपथ घेताना केलेल्या पॅलेस्टाईनच्या जयजयकाराबाबत विचारण्यात आले. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनच्याबाबतीत भारत सरकारचं धोरण काय आहे हे आधी स्पष्ट करा. पॅलेस्टाईन हा एक देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होतान आम्ही पाहतोय. मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही. पण अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये, अशी नरेंद्र मोदी यांचीही भूमिका आहे. पॅलेस्टाईनमधील नरसंहाराबाबत जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जर काही ओवेसींकडून चूक झाली असेल, तर केंद्र सरकारने कारवाई करावी. पण मी सांगतो की पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्याप्रकारे नरसंहार सुरू आहे, त्यावर संपूर्ण जगाला चिंता आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी सभागृहात शपथ घेत असताना पॅलेस्टाईनचा जयजयकार केल्याने उदभवलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीव ओवेसी म्हणाले की, मी सभागृहात काहीही चुकीचे बोललो नाही. मी घटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही. शपथविधीदरम्यान 'जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला. पॅलेस्टाईनचा मुद्दा भारतासाठी नवीन नाही. बरेच जण, बरेच काही बोलत आहेत. मी म्हणालो- जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फिलिस्तीन. हे घटनेच्या विरोधात कसे काय असेल? संविधानात अशी तरतूद दाखवा. नेहमी आपलेच खरे म्हणता येणार नाही. दुसरे काय म्हणतात हेही आपण एकदा ऐकून घ्यायला हवे. मला जे बोलायचे होते, ते मी बोललो, असा दावा ओवेसी यांनी केला.