सिल्वासा: देशात अनेकविध निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी महानगरपालिका, विधानसभा निवडणुकात तर काही ठिकाणी लोकसभेच्या पोटनिवडणुसांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचा (Dadra And Nagar Haveli Bypoll) प्रचार शिगेला पोहोचलाय. येथे घेतलेल्या एका जनसभेला संबोधित करताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून, देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही, असा घणाघात केला आहे.
NCB ने अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेले अधःपतन मला बघवत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल हा त्यांचा गैरसमज आहे
देवेंद्र फडणवीस यांना काय बोलायचे ते बोलू द्या. भाषणात ते टाळीची वाक्ये घेतात. पण, काल इथे त्यांना टाळ्याही पडल्या नाहीत, असे मला कळाले. फडणवीस यांना वाटत असेल की ते इथे आल्याने मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. तपास यंत्रणांचा वापर हा केंद्राचा महाराष्ट्र सरकार विरोधातील कट आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. आम्हाला खडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासकाच्या खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत? इथली जनता त्रस्त आहे. म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करीत आहेत. आम्हाला पूर्ण खात्री ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? अशी विचारणा करत ते इथे आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आपले भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, दे मोदींनी देशात करुन दाखवले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.