“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:40 PM2024-07-03T15:40:02+5:302024-07-03T15:40:54+5:30
Sanjay Raut News: ४०० पार म्हणताना जेमतेम २०० पार गेले. राहुल गांधींमुळे हे झाले आणि तेच आता समोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले, हे बहुतेक सहन होत नसावे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील दोन दिवसीय चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सहभाग घेऊन एनडीए सरकारवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी याला उत्तर देताना एनडीएचा तिसरा कार्यकाळ, विकसित भारताचा संकल्प, संरक्षण यांसारख्या विषयावर भाष्य करताना काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.
आपल्या सरकारचे १० वर्षांचे काम पाहून जनतेने सरकारला सलग तिसऱ्यांदा कौल दिला आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'चा पराभव केल्याचे जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण केलेल्या चुका उघड न करता सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बालबुद्धी व्यक्तीचा विलाप सभागृहाने पाहिला. काँग्रेस देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. काँग्रेसने सलग तीन वेळा १०० जागांचा टप्पा न ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांना गर्व चढला आहे. काँग्रेसने आपला पराभव मान्य करून आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते; पण ते 'शीर्षासन' करण्यात व्यस्त आहेत, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी खोचक शब्दांत टोलेबाजी केली. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सडकून टीका केली.
बालबुद्धीच्या नेत्याने मोदींना घाम फोडला
बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्याच भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता सत्ताधारी पक्षात आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पाठीशी २३४ खासदारांचे बळ असताना त्यांना संसदेत अशाप्रकारे अपमानित करू शकत नाहीत. यावरून तुमची संस्कृती दिसून येते. नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावले आहे. ४०० पार म्हणता म्हणता ते जेमतेम २०० पार गेले. याला राहुल गांधी जबाबदार आहेत. तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावे. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला. याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावे लागले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक आधार आहे. त्या पदवरील व्यक्तिला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो व्यक्तिचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे. म्हणून संविधान धोक्यात आहे, असे आम्ही म्हणतो. मोदी संविधान, घटना मानायला तयार नाहीत. लोकसभेमध्ये भाजपाने काही जागा कशा चोरल्या, हे सांगत असताना माझा माईक बंद करण्यात आला. भाजपाकडून सारखे आणीबाणीचा विषय काढण्यात येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.