मुंबई - राजकारणात शेवटपर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, आणि कोणीही कोणाचं मित्र नसतं हेच अनेकदा समजून आलंय. कारण, ज्या पक्षाविरुद्ध नेतेमंडळी जोरजोरात आणि मोठी टिका करतात. कालांतराने त्याच पक्षात ते दिसून येतात. आता, काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राणा यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेच्या नादाला लागाल तर 20 फूट खड्ड्यात पुरणार, अशी भाषा केली होती. आता, तेच संजय राऊत आणि आमदार रवि राणा हे एकाच पंगतीत जेवताना दिसत आहेत. त्यामुळे, काय म्हणता राऊतसाहेब, असा प्रश्न तर रवि राणांनी विचारला नसेल ना.
महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून संजय राऊत, नवनीत राणा यांच्यासह एकूण ३० खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाख दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्तानं दोघंही एकमेकांसमोर येणार का? आणि दोघांमध्ये काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यातच, आता रवि राणा आणि संजय राऊत यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत.
संजय राऊत आणि रवि राणा हे जेवण करतानाचा हा फोटो आहे. या दोघांमध्ये आणखी एक खासदार महोदय बसले आहेत. मात्र, दोघेही पुढे येऊन वाकून, एकमेकांशी संवाद साधत आहेत. सोशल मीडियावर राऊत आणि राणा यांचा हा फोटो व्हायरल झाला असून या फोटोवर नेटीझन्स मिम्स बनवत आहेत. तसेच, राजकीय वादातून कार्यकर्तेच एकमेकांचे विरोधक बनतात, पण नेते मात्र एकच असतात, अशीही चर्चा समाज माध्यमांवर होत आहे.
परराष्ट्र व्यवहार समितीचा दौरा गेल्या चार दिवसांपासून लेह आणि लडाखमध्ये सुरू आहे. यात खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका सदस्याला घेऊन येण्याचीही मूभा असते. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा देखील आहे. देशातील एकूण ३० खासदारांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील फक्त तीन खासदार असून यात संजय राऊत, नवनीत राणा आणि प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राची परंपरा
काश्मीरच्या खंडगार वातावरणात खासदार फिरत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात कितीही हवेदावे किंवा राजकीय वैर असलं तरी अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय वैर बाजूला सारून संवाद साधण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून संजय राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यात चर्चा झाली असावी असा अंदाज सध्या तरी लावला जात आहे.