नवी दिल्ली: गेल्या अनेक वर्षांपासून दसरा म्हटले की, शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा मेळावा हे समीकरण अगदी घट्ट जमले आहे. मात्र, गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. मात्र, यंदाही कोरोना संकट असले, तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, ऑनलाइन होणार नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही तीच इच्छा असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजत राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (sanjay raut says shiv sena dussehra melava will not be online)
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील हिंसाचाराविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. यातच मंगळवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही
कोरोनाचे संकट काहीसे ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही तीच इच्छा आहे. आताच्या घडीला यासंबंधी चर्चा सुरु असून, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईला तिसऱ्या लाटेचा कसलाही धोका नाही, असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात तशी माहिती दिली. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या २५८६ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ३९४२ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले.