Kangana Ranaut Sanjay Raut, Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत, शिवसेना यांच्याविरोधात कंगना राणौत हिने टीका केली होती. परिणामी कंगना विरूद्ध उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यातील संघर्ष अनेक दिवस चालला. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, तसेच मूळ शिवसेना शिंदे यांचीच असल्याचा निर्णय झाला, तेव्हादेखील कंगनाने उद्धव यांना डिवचले होते. त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत कंगना हिलादेखील उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावर आज शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
"कंगना राणौत यांना उमेदवारी का देण्यात आली हे मी सांगू शकत नाही. या देशात लोकशाही आहे आणि आम्ही लोकशाही मानतो. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. अभिनेत्री कंगना राणौत यांचे विचार भाजपाच्या विचारधारेशी मिळतेजुळते असतील तर त्या नक्कीच निवडणूक लढवू शकतात. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून त्या उभ्या राहत आहेत, तर कोणाला जिंकवायचे आणि कोणाला पराभूत करायचे ते लोकांना ठरवू दे," अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाच्या उमेदवारीबाबत भाष्य केले.
"भाजपा हा मोठा पक्ष नाही. हा पक्ष कधीच मोठा नव्हता. एखादा दरोडेखोर जसे चोऱ्या-माऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो तसं भारतीय जनता पक्षाचं सुरु आहे. दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली संपत्ती वाढवायची याला मी धनिक मानत नाही. लहान पक्षातून लोकं फोडायची आणि विकत घ्यायची, यात काहीच कौशल्य नाही. जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा त्यांची पार्टी शिल्लक राहणार नाही", असा इशाराच राऊतांनी दिला.