Sanjay Raut News:संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटले होते. यानंतर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत, हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. मात्र, संजय राऊत हे विधिमंडळाचे सदस्य नाहीत, ते राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे सदर प्रस्ताव राज्यसभेकडे पाठवण्यात आला होता. या हक्कभंगाच्या प्रस्तावावर संजय राऊत यांनी उत्तर दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. राज्याच्या विधानमंडळाबाबत आक्षेपार्ह विधान हे विधानमंडळ खपवून घेणार नाही. राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी भारतीय संविधानाचा आणि विधिमंडळाचा अपमान केला आहे. यातून महाराष्ट्राचा अपमान झाला आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. विधिमंडळात स्थापन केलेल्या समितीकडे संजय राऊतांनी म्हणणे मांडले होते. मात्र, त्यावर समितीचे समाधान झाले नाही. यानंतर संजय राऊत राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे हा प्रस्ताव राज्यसभा सभापतींकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
संजय राऊतांनी सादर केलेल्या उत्तरात नेमके काय म्हटलेय?
मला महाराष्ट्र राज्य विधानसभा आणि भारतीय संसदेचा अत्यंत मान-सन्मान आहे. मी कधीही सन्माननीय विधानसभा आणि भारतीय संसदेचा अवमान करण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्याविरोधातील भरत गोगावले आणि अतुल भातखळकर यांच्या तक्रारीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझे वक्तव्य केवळ काही आमदारांच्या ग्रुपबाबत होते. माझ्याविरोधात केलेले आरोप चुकीचे आहेत आणि ते आरोप रद्द करण्यात यावे. आमदारांबाबत केलेले वक्तव्य राज्यसभेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन किंवा अवमान करणारे नाही, असे संजय राऊतांनी आपल्या उत्तरात म्हटल्याचे सांगितले जात आहे.