नवी दिल्ली - शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, भाऊ चौधरी हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय होते, अशी चर्चा आता सर्वत्र होत आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी पक्षाची आणि स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. सध्या ते हिवाळी अधिवेशनानिमित्ताने राजधानी दिल्लीत आहेत.
संजय राऊत यांनी ट्विट करायच्या आधी त्यांचे निकटवर्तीय नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे बाळा सावंत, भाऊ चौधरी आणि बंधु सुनिल राऊत यांच्या नावाची चर्चा झाली. तसेच, नाशिकचा कोणी नेता आहे का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. पण, संजय राऊत यांनी ट्विट केल्याने भाऊ चौधरींच्या प्रवेशाचे गुपीत उलगडले. त्यानंतर, रात्री उशिरा भाऊ चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुन, आता संजय राऊत यांनी महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे. तसेच, शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला.
पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचेच असतात. राज्यातील सर्वच नेते, कार्यकर्ते माझ्या जवळचे असतात. कारण, मी पक्षाचा नेता आहे. एकनाथ शिंदे आमच्या जवळचे होते, दादा भुसे जवळचे होते. उदय सामंत हेही जवळचेच होते. मात्र, संघर्षाच्या काळात जे सोबत राहतात ते आपले जवळचे. अशा काळात जे जातात ते पळपुटे असतात, त्यांची काही व्यक्तीगत कारणं असततात, त्यांना आम्ही फार किंमत देत नाही. हे काही लोकनेते नव्हते, पक्षाने पदं दिली म्हणून ते मोठे झाले. हकालपट्टी करेपर्यंत त्यांचं नावही कुणाला माहिती नव्हतं, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या भाऊ यांच्याबद्दल उद्गार काढले.
२०२४ मध्ये सर्वांचा हिशोब होईल
कोणत्याही राजकीय पक्षात माणसं येत असतात, जात असतात. काँग्रेस पक्षातूनही माणसं गेली आहेत, कधी काळी भाजपातूनही निघून गेली. तरी, आज सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी भारत जोडो यात्रा निघाली आहे ना, असा सवाल राऊत यांनी केला. तसेच, पक्ष कधीही संपत नसतो, असेही ते म्हणाले. काही स्वार्थी आणि बेईमान लोकं सोडून गेले म्हणजे पक्ष संपला असं नाही, हे बेईमान कोणाचेच नसतात. जे शिवसेनेला आई म्हणायचे, त्या शिवसेनेचे झाले नाहीत, ते इतरांचे काय होणार, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर प्रहार केला. तसेच, २०२४ मध्ये जेव्हा आमची सत्ता येईल, तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.
मी हे विधान करत आहे, त्याबद्दल माझ्यावर जी काही कारवाई करायची आहे ती करा. पण, महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, तेव्हा पाहू, असेही राऊत यांनी म्हटले.