नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. राज्याच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकारण जोरात सुरु आहे. यातच आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर कोणत्याच आघाडीचा घटक नसलेला शिवसेना हा पक्ष लवकरच संयुक्त पुरोगामी आघाडीत (UPA) सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेणार आहेत.
या भेटीत संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यूपीएबाबत नेमकी भूमिका काय आहे, हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगतील, असे म्हटले जात आहे. याबाबत काँग्रेस वा शिवसेनेकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या महत्वाच्या दोन बैठकांकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकीत होणारा निर्णयामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत संजय राऊत, आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते व यूपीए अस्तित्वातच नसल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी काँग्रेसचे महत्त्व अधोरेखित केले होते व थेट ममता यांच्या विधानाला विरोध न करता समतोल भूमिका घेतली होती. त्यामुळेच शिवसेना काँग्रेसच्या आणखी जवळ जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच, या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात होते.
शिवसेना 2019 पासून एनडीएतून बाहेर2019 मध्ये शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शिवसेना एनडीए बाहेर पडली होती. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवेसना राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी झाली नव्हती.
शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठकदुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या दुपारी साडे तीन वाजता दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षातंर्गत होणार्या निवडणूका कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.