कोलकाता : येथील आर. जी. कार वैद्यकीय रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. या बलात्कार, हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, या मागणीसाठी डॉक्टरांनी प्रदीर्घ आंदोलन केले होते.महिला डॉक्टरबाबत अमानुष प्रकार घडल्यानंतर १६२ दिवसांनी हा निकाल आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती अनिर्बन दास यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.
कार रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट २०२४ रोजी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रॉयला अटक केली. न्या. दास यांनी सांगितले की, संजय रॉयने महिला डॉक्टरवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. सीबीआयने केलेल्या तपासात आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. सोमवारी त्याला शिक्षा सुनावली जाईल. (वृत्तसंस्था)
काय म्हणाला आरोपी रॉय?दोषी ठरवलेल्या संजय रॉय याने सांगितले की, माझ्यावर खोटे आरोप दाखल करण्यात आले आहेत. मी गळ्यात रुद्राक्षाची माळ घालतो. मी गुन्हा केला असता तर ही माळ तुटली असती. या प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्याचा हात आहे, असा आरोपही त्याने केला.
हत्येत आणखी काही लोकांचा हात...निकालाबद्दल महिला डॉक्टरच्या पालकांनी न्याययंत्रणेचे आभार मानले आहेत. माझ्या मुलीच्या हत्येत आणखी काही लोकांचा हात असून त्यांना अटक झालेली नाही, असे महिला डॉक्टरच्या आईने सांगितले. या आरोपांची चौकशी करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.
निकालाला आव्हान देणार नाही : बहीणसंजय रॉयच्या मोठ्या बहिणीने निकालाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार नसल्याचे सांगितले.