नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी योगी आदित्यनाथांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथांनी केजरीवालासंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथांनी काल प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांचा संबंध पाकिस्तानशी जोडला होता. त्याविरोधात आता आपचे खासदार संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं दिल्लीतल्या योगींच्या प्रचारावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाकडे उद्या दुपारी 12 वाजता भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. जर निवडणूक आयोगानं वेळ दिला नाही, तर आम्ही निवडणूक कार्यालयाच्या बाहेरच बसून राहू, असं सांगितलं आहे.आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत संजय सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनोरुग्ण आहेत. केजरीवालसंदर्भात ते काहीही बडबडत आहेत. केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध आहेत, असं ते म्हणतात. मला नाही माहिती भाजपावाल्यांना पाकिस्तानसंदर्भातच सर्व माहिती कशी मिळते. आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे. निवडणूक आयोगाला भेटून आम्ही योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक प्रचारांतर्गत प्रतिबंध घालण्यासह एफआयआर दाखल करण्याची मागणी करणार आहोत. दिल्लीच्या करावल नगर चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीला संबोधित करताना काल योगी आदित्यनाथ यांनी शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवरही निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरमध्ये जे लोक दहशतवाद्यांचं समर्थन करत आहेत. तेच लोक आता शाहीन बागेत आंदोलने करत आहेत. आझादीच्या घोषणा देत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मोदी आल्यापासून दहशतवादी बिर्याणी नव्हे तर गोळ्या खात आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती ही बॅलेट आहे, बुलेट नाही. त्यामुळे तुम्ही बॅलेटमधून केजरीवाल सरकारला धडा शिकवा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केले होतं.
केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 7:02 PM