नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघावर नव्याने निवडून आलेल्या संजय सिंह आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीला मोठा धक्का देत बरखास्तीचा निर्णय घेतला. क्रीडा मंत्रालयाचा हा निर्णय कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. कारण संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे अत्यंत खास म्हणून ओळखले जातात.
'सरकारने चांगला निर्णय घेतला'; साक्षी मलिकची प्रतिक्रिया, निवृत्तीच्या निर्णयावरही केलं भाष्य!
कुस्ती महासंघाचे नवनियुक्त कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर संजय सिंह यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय स्पर्धा होण्याआधी सतत काहीतरी घटना घडत आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतल्याचं सांगितलं आहे. तर, साक्षी मलिकनेही कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. आरोप लागलेले आणि लावणारे दोघांनीही निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दोघांनी नवनियुक्त कार्यकारणीला शांततेत कार्य करत मुलांचं भविष्य घडवून द्यावं, असं आवाहन संजय सिंह यांनी केलं आहे. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री यांच्याशी बोलणार आहे. कारण मुलांचं आयुष्य उद्धवस्त होत आहे, अशी माहिती देखील संजय सिंह यांनी दिली.
तरुण पैलवानांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून स्पर्धेचे आयोजन करायचे होते. आता सरकारने हवं त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करावी. जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो निवडून आलेल्या लोकांनी घ्यावा. मी १२ वर्षे कुस्ती खेळली, आता माझा कुस्तीशी संबंध नाही. मी फार पूर्वीच कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती आयोजित करावी, अन्यथा मुलांचे एक वर्ष वाया जाईल,' असं कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह म्हणाले.
कोण आहेत संजय सिंह?
संजय सिंह मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ते कुटुंबासह वाराणसीमध्ये राहतात. संजय सिंह दीड दशकांहून अधिक काळापासून कुस्ती संघटनेशी जोडले गेले असून ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. २००८ पासून ते वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय ते कुस्तीगीर संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारीही पार पाडत आहेत. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना पुढे आणण्यात संजयसिंग बबलू यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.