आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिलं आहे. "अरविंद केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं आहे" असं संजय सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच "पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) केजरीवाल यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवून असल्याचं त्यांना सूत्रांकडून समजलं आहे. केजरीवाल यांची हेरगिरी करत असल्याचं दिसतंय. केजरीवाल यांना 23 दिवसांपासून इन्सुलिन देण्यात आलं नाही."
"दिल्लीतील जनतेची सेवा करणे हा केजरीवालांचा गुन्हा आहे का? त्यांच्याशी हे वैयक्तिक वैर का? विरोधी पक्षनेत्याचा जीव घेऊन त्याला संपवायचं आहे का? हे सर्व पीएमओ आणि एलजी यांच्या देखरेखीखाली होत आहे याचं मला दुःख आहे" असंही आप नेत्याने पत्रात म्हटलं आहे. तिहारमध्ये कैद्यांमधील भांडणाची घटना समोर आल्यानंतर आपने केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
संजय सिंह म्हणाले की, तिहार जेलमध्ये हत्या झाल्याचं तुम्हाला माहीत आहे का? उद्या अरविंद केजरीवाल यांच्यावरही असाच हल्ला झाला तर काय होईल? तिहार तुरुंगात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका आहे. तिहार तुरुंगातील सुरक्षेतील त्रुटी आणि काल रात्री झालेल्या हिंसाचाराचा दाखला देत आपने हे म्हटलं आहे.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी 9 समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. अटकेनंतर केजरीवाल सुमारे 10 दिवस ईडीच्या कोठडीत होते. यानंतर 1 एप्रिल रोजी न्यायालयाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 15 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना पुन्हा 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. सध्या त्यांची न्यायालयीन कोठडी 7 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.