नवी दिल्ली : नवे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. चंद्रचूड यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खन्ना हेच सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, न्या. संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील, असे सांगण्यात आले.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी केंद्रीय विधी खात्याला लिहिलेल्या पत्रात नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांची निवड करावी, अशी शिफरस आपण करीत असल्याचे म्हटले आहे.
न्या. खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत न्या. खन्ना हे देशाचे ५१वे सरन्यायाधीश बनणार आहेत. १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत आहे. त्यांना सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहण्यासाठी फक्त सहा महिन्यांचा अवधी मिळणार आहे.