ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - 'गुंज' या एनजीओचे संस्थापक अंशु गुप्ता व दिल्लीतील 'एम्स'चे माजी दक्षता अधिकारी संजीव चतुर्वेदी या दोघांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजसेवा, सरकारी नोकरी, पत्रकारिता व कला तसेच नवं नेतृत्व या विभागांसाठी 'फिलिपिन्स' सरकारतर्फे आशियातील 'नोबेल पुरस्कार' मानला जाणारा ' रॅमन मॅगसेसे' हा पुरस्कार दिला जातो.
अंशु गुप्ता यांनी कॉर्पोरेट जगातील उच्च पदाची नोकरी सोडून १९९९ साली 'गुंज' नावाची स्वयंसेवी संस्था ( एनजीओ) स्थापन केली. नैसर्गित आपत्तीवेळी संकटग्रस्तांना, पीडितांना मदत करण्याचे महत्वाचे कार्य गुंजच्या माध्यमातून केले जाते. समाजसेवा व मावी दृष्टिकोनातून गरिबांना मदत करण्याचेही काम करणा-या 'गुंज'चे भारतातील २१ राज्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे.
तर यंदाचा पुरस्कार मिळालेले दुसरे भारतीय असलेले संजीव चतुर्वेदी हे भारतीय वन सेवेतील अधिकारी असून सध्या ते 'एम्स'चे उपसचिव म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांच्याकडे 'एम्स'च्या दक्षता अधिकारपदाचा अतिरिक्त कार्यभारही होता, मात्र एम्समधील भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणल्यामुळे गेल्यावर्षी चतुर्वेदी यांच्याकडून तो कार्यभार काढून घेण्यात आला. भ्रष्ट अधिका-यांनी वरिष्ठांकडून जबाव आणल्यानेच चतुर्वेदींकडून कार्यभार काढून घेण्यात आला होता.
यापूर्वी सामाजिक कार्य करणा-या भारतातील अनेक नामवंत व्यक्तींना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विनोबा भावे, प्रकाश व मंदाकिनी आमटे, नीलिमा मिश्रा यांसारख्या अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला होता.