यंदाच्या संसद रत्न पुरस्कारासाठी १३ खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. या खासदारांमध्ये आठ लोकसभा आणि पाच राज्यसभेचे सदस्य आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या चार खासदारांचाही समावेश आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती यांच्या सह-अध्यक्षपदी असलेल्या प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाच्या ज्यूरीने खासदारांना नामनिर्देशित केले आहे. ज्युरीने विशेष पुरस्कार श्रेणी अंतर्गत दोन विभागांशी संबंधित स्थायी समित्या आणि एका प्रतिष्ठित नेत्याला नामनिर्देशित केले. या समितीमध्ये प्रतिष्ठित खासदार आणि नागरी समाजाचे सदस्य यांचा समावेश आहे.
लोकसभेतून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजपच्या हिना विजयकुमार गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता आणि राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांचा संसदरत्न पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे.
17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2022 संपेपर्यंत प्रश्न, खाजगी सदस्यांची विधेयके आणि सदस्यांवरील चर्चेदरम्यानच्या त्यांच्या कामगिरीवर या पुरस्कारासाठी नामांकन केले गेले आहे.
तर राज्यसभेतून सध्याचे सदस्यांतून सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा आणि राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांची निवड करण्यात आली आहे. विश्वंभर प्रसाद निषाद (SP) आणि छाया वर्मा (काँग्रेस) यांना त्यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सेवानिवृत्त सदस्य श्रेणी अंतर्गत नामांकन देण्यात आले आहे.
वित्त समिती (लोकसभा समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा) आणि परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समिती (राज्यसभा समितीचे अध्यक्ष व्ही विजयसाई रेड्डी, YSR काँग्रेस) यांना 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकित करण्यात आले आहे. २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.