नवी दिल्ली : उंचच उंच आकाशात झेपावण्याची उत्सुकता. एरव्ही जमिनीवरून छोटे वाटणारे भव्य विमान प्रत्यक्षात डोळ्यात साठविण्याची लगबग. मुंबईहून दिल्लीपर्यंतची हवाई सफर. विमानात बसल्यावर खिडकीतून दिसणारे ढगांचे अपूर्व आकार. सारे काही डोळ्यात सामावून घेत होतो आम्ही. विमान उड्डाण घेताना नि उतरताना थोडीशी भीतीही वाटली. दिल्लीत राष्ट्रपती भवन पाहिले, मोठ्या नेत्यांना भेटलो; पण आम्हाला सर्वात अविस्मरणीय अनुभव होता- आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसण्याचा.लोकमत ‘संस्कारांचे मोती’ हवाई सफर स्पर्धेतील विजेते विद्यार्थी हेच अनुभव अतीव उत्साहाने संयोजकांना सांगत होते. ‘लोकमत’च्या आगळ्यावेगळ्या संस्कारांचे मोती सफरीचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी कौतुक केले.वाणिज्य मंत्रालयातील अतिरिक्त महासंचालक मोनादीपा मुखर्जी (आयआयएस) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोबाईल हे शस्त्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती तलवार आली, त्यांनी स्वराज्य उभारले. माकडाच्या हाती तलवार आली, तर तो स्वत:चाच नाश करतो. त्यामुळे लहान वयात मुलांना मोबाईल देणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे हवाई सफरीतील सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल होते. त्यावर मुखर्जी म्हणाल्या, या वयात मोबाईल वापरणे चूक आहे. पालकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. गाव व नावासह त्यांनी विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली.हवाई सफरीचे नियोजन लोकमतचे सहायक उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, विजय काळसेकर, संजय पाटील, गजेंद्र बैस, सचिन देवधरे, गंगाधर पठाडे यांनी केले. हवाई सफरीतील विजेत्यांनी राष्ट्रपती भवन, इंडियागेट, इंदिरा गांधी स्मृती भवन, वॉर मेमोरिअल आणि रेल्वे संग्रहालयास भेट दिली.समस्या सोडविण्यासाठी काम करा -गडकरीमहाराष्ट्र व गोवा राज्यांतील कानाकोपऱ्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी दिल्लीत विविध ठिकाणांना भेट दिली. लोकमतवरील अतीव विश्वासामुळेच आम्हाला पालकांनी इतक्या दूर दिल्लीला हवाई सफरीसाठी पाठविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांचे अनुभव ऐकल्यावर नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.छोट्या गावातील मुला-मुलींना हवाई सफरीचे बक्षीस मिळवून देणाºया लोकमत ‘संस्कारांचे मोती’ उपक्रमाची त्यांनी माहिती घेतली व या उपक्रमास शुभेच्छाही दिल्या. देशाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करा. आपल्या सभोवतालच्या समस्या समजून घ्या, त्या सोडविण्यासाठी काम करा, असा संदेश केंद्र्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.यशाची त्रिसूत्रीचारित्र्य, कठोर परिश्रम व प्रामाणिकपणाला पर्याय नाही. यशस्वी होण्याची हीच तीन सूत्रे असल्याचा कानमंत्र केंद्रीय दूरसंचार, तसेच मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मुलांना दिला. जे काम कराल ते उत्तम करा, सचोटीने करा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘संस्कारांचे मोती’ हवाई सफर : प्रथमच विमानात बसण्याचा विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 4:45 AM