चेन्नई : येत्या ७ ते १३ आॅगस्ट दरम्यान ‘संस्कृत सप्ताह’ साजरा करण्यासंबंधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) त्यांच्या सर्व संलग्न शाळांना पाठविलेल्या परिपत्रकावरून तामिळनाडूत वातावरण तापले असून केंद्र सरकार या मंडळाच्या माध्यमातून सक्तीने संस्कृत लादण्याचा आपला छुपा ‘अजेंडा राबवीत असल्याचा आरोप करून ‘एमडीएमके’ या भाजपाच्या मित्रपक्षासह इतर द्राविडी पक्षांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.एमडीएमकेचे सरचिटणीस वायको यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, केंद्र सरकारने सीबीएसईच्या माध्यमातून संस्कृत सक्तीने लादणे हे क्लेषदायक असून हा भारताच्या संमिश्र संस्कृतीवर घाला आहे. वायको म्हणतात की, संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी असल्याचे सीबीएससीच्या परिपत्रकातील विधान असत्य आहे. तमिळ ही खऱ्या अर्थी प्राचीन अभिजात भाषा आहे. पीएमकेचे नेते एस. रामदास म्हणाले की, फक्त १४ हजार लोक संस्कृत बोलतात. सरकारने सर्वच भाषांच्या अभिवृद्धीला प्रोत्साहन द्यायला हवे. द्रमुकचे संघटन सचिव टीकेएस एलानगोवन म्हणाले की, अशा प्रकारे एका ठराविक भाषेच्या सक्तीने देशाचे तुकडे पडतील. (वृत्तसंस्था)
‘संस्कृत सप्ताहा’वरून तामिळनाडूत आगपाखड
By admin | Published: July 18, 2014 1:38 AM