नवी दिल्ली - समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे अनेक लोक आहेत. इतरांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. अशीच एक व्यक्ती आता समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने तब्बल 50 लाख दान केले आहेत. ज्या गावात डॉक्टर मिळत नव्हता तिथे आता रुग्णालय साकारण्यात येणार आहे. छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. 85 वर्षीय संत गुरुसुख दास साहेब (Sant Gurusukh Das Saheb) यांनी गावात रुग्णालय बांधण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयासाठी येणारा 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च ते स्वत: करणार आहेत.
आपल्या पत्नीच्या निधनानंतर संत गुरुसुख दास साहेब यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि उपचारासाठी वणवण भटकावे लागू नये, या उद्देशाने बालोद जिल्ह्यातील आपल्या गावात रुग्णालय बांधण्यास सुरुवात केली आहे. ज्या गावात पूर्वी एक डॉक्टर मिळणं कठीण होतं, त्या गावात आज मोठं रुग्णालय बांधण्याची तयारी सध्या सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालोड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 28 किमी अंतरावर असलेल्या गावात 50 लाख रुपयांच्या देणगीतून हे रुग्णालय बांधले जात आहे. रक्कम दिल्यानंतर ग्रामविकास समिती व ग्रामपंचायतीच्या संमतीनंतर पंचायतीजवळील शासकीय जमिनीवर रुग्णालय उभारणीचे कामही सुरू झालं आहे.
लाखो रुपयांची आयुष्यभराची ठेव केली दान
गावात रुग्णालय आणि कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधेअभावी गावातील लोकांना होणारा त्रास पाहता गुरुसुख दास यांनी लाखो रुपयांची आयुष्यभराची ठेव दान केली आहे. गुरुसुख गावातील तलावाजवळ असलेल्या घरात एकटेच राहतात. 18 मे 2021 रोजी त्यांची पत्नी सोनाबाई यांचे निधन झालं. त्यांना मुले नाहीत. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी आता आपली संपूर्ण मालमत्ता धर्मादाय कार्यात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गावात रुग्णालय बांधण्यासाठी देणगीदार गुरुसुख दास यांच्यासह गावचे प्रमुख, सरपंच आणि इतर वरिष्ठांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी त्याला संमती मिळवली. मुख्यमंत्री बघेल यांनीही या कामाचं कौतुक केलं.
सहज आणि पटकन उपचार घेणं शक्य होणार
गुरुसुख दास साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवाची किंवा इतर प्राण्यांची सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व जीवांची सेवा केली पाहिजे. तब्येत बिघडल्याने अनेकवेळा ग्रामस्थांना उपचारासाठी खूप दूरवर फिरावं लागतं. रुग्णालयाच्या अंतरामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्यात अडचण येते तसेच वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. मात्र आता रुग्णालय बांधल्यानंतर येथे लोकांना सहज आणि पटकन उपचार घेणं शक्य होणार आहे. त्यांची चांगली सोय होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.