पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी महाकुंभबद्दल बोलताना मृत्यू कुंभ असा उल्लेख केला. यावरून वाद निर्माण झाला संत-महंतांनी संताप व्यक्त करत जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी केली. 'ममता बॅनर्जी ज्या जबाबदार पदावर आहेत, तिथे असताना अशा प्रकारची विधाने करणे त्यांना शोभत नाहीत,' असे श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीचे राष्ट्रीय सचिव महंत जमुना पुरी यांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'हा मृ्त्यू कुंभ आहे', या ममता बॅनर्जींच्या विधानावर बोलताना महंत जमुना गिरी म्हणाले, 'प्रयागराज महाकुंभ अमृत पर्व आहे, त्याची दिव्यता आणि भव्यता संपूर्ण जग बघत आहे. त्यांनी महाकुंभच्या नावाबद्दल असे अपमानास्पद शब्द वापरायला नको होते.'
बंगाल सनातन्यांसाठी मृत्यू प्रदेश बनत चालला आहे -गिरी
पंच दशनाम आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुण गिरी म्हणाले, "पश्चिम बंगाल हिंदू सनातन्यांसाठी मृत्यू प्रदेश बनत चालला आहे. हजारो सनातन्यांचा नरसंहार केला जात आहे आणि निवडणुकीच्या वेळी लाखो हिंदूंना पलायन करावे लागत आहे. त्यांनी त्यांच्या राज्याची चिंता करायला हवी, उत्तर प्रदेशची नाही.'
निर्मोही अनी आखाड्याचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास ममता बॅनर्जींना उद्देशून म्हणाले, "प्रयागरजा महाकुंभ सनातन धर्माची दिव्यता प्रस्थापित केली आहे. त्या महाकुंभाला नाव ठेवत आहे, कारण त्यांनी नेहमीच सनातन आणि त्या प्रतिकांचा अपमान केला आहे.'
ममता बॅनर्जींनी काय केले होते विधान?
"हा मृत्यू कुंभ आहे. मी महाकुंभाचा आदर करते. मी पवित्र गंगा मातेचा आदर करते, पण तिथे काहीही नियोजन नाहीये. तिथे श्रीमंत आणि व्हीआयपींसाठी तंबू मिळण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. १ लाख रुपयांना तंबू आहे. पण, गरिबांसाठी तिथे कोणतीही व्यवस्था नाहीये. चेंगराचेंगरीची स्थिती कुंभमेळ्या सामान्य बाब झाली आहे. व्यवस्था करण्याची गरज आहे. तुम्ही काय व्यवस्था केली आहे?", असे ममता बॅनर्जींनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला म्हणाल्या होत्या.