काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन; भारत जोडो यात्रेदरम्यान हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:04 AM2023-01-14T10:04:31+5:302023-01-14T10:04:57+5:30
पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज निधन झाले. भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते, या दरम्यान त्यांची अचानक तब्येत बिघडली.
पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज निधन झाले. भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते, या दरम्यान त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना फगवाडा येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झााला. यात्रेत संतोख सिंह यांची प्रकृती खालावताच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ रुग्णालय गाठले.
आज सकाळी ७ वाजता लुधियानाच्या लोदोवाल येथून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू झाला. ही यात्रा जालंधरमधील गोराया येथे सकाळी १० वाजता पोहोचणार होती, तिथे जेवणासाठी ब्रेक होणार होता. त्यानंतर दुपारी ३ वाजता हा प्रवास पुन्हा सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजता फगवाडा बस स्थानकाजवळ थांबणार होता.
2024 मध्येही भाजप सत्तेत असणार का? शशी थरूर यांनी मोठ्या विजयाचे केले भाकीत,पण...
आज यात्रेचा रात्रीचा मुक्काम कपूरथला येथील कोनिका रिसॉर्टजवळील मेहत गावात होता, मात्र आज सकाळी ९.३० च्या सुमारास काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाल्याने यात्रा थांबवण्यात आली आहे. मात्र, आज ही यात्रा थांबवली जाणार की राहुल गांधी पुन्हा यात्रेत सहभागी होणार याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
भारत जोडो यात्रा ३० जानेवारीला श्रीनगर, काश्मीरमध्ये संपणार आहे. काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून राहुल गांधी यात्रेची सांगता करणार आहेत. भारत जोडो यात्रेच्या समारोपाला काँग्रेसला विरोधी एकीची ताकद दाखवायची आहे, त्यासाठी २१ समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. केसीआर ते अरविंद केजरीवाल, एचडी देवेगौडा आणि ओवेसी यांच्यापर्यंत जवळपास ८ राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही.