अहमदाबाद : दहावी आणि बारावी या दोन परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यात चांगले गुण मिळवायला विद्यार्थी अतिशय मेहनत घेतात. त्यात मिळणाऱ्या गुणांवरच करिअरची पुढची दिशा ठरणार असते. पण एखाद्या विद्यार्थ्याने बारावीमध्ये विज्ञान शाखेत तब्बल ९९.९९ टक्के गुण मिळविले आणि नंतर अचानक संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तर काय वाटेल? त्यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही. पण अहमदाबादमध्ये राहणाऱ्या जैन समाजातील १७ वर्षाच्या वर्शील शाह याने इतके गुण मिळूनही संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे. वर्शीलने बारावीच्या परीक्षेमध्ये ९९.९९ टक्के गुण मिळविले. तेही विज्ञान शाखेत. इतके उत्तम गुण मिळाल्यानंतर तुला काय बक्षीस हवे, असे पालक विचारतातच. पण वर्शीलने स्वत:च बक्षीस म्हणून संन्यास घेण्याची परवानगी आई-वडिलांकडे मागितली. आश्चर्य म्हणजे वर्शीलच्या आई-वडिलांनी ती दिलीही. वर्शीलला आपल्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप नव्हे, तर आनंदच झाला. सुरतमध्ये त्याचा दीक्षा समारंभ गुरुवारी पार पडला. यापुढे तो सुविर्य रत्न विजयजी महाराज या नावाने ओळखला जाईल. आता तो गुरू कल्याणरत्न विजय यांच्यासोबत असेल.दीक्षा समारंभाला तो शेरवानी घालून आला होता. दीक्षा दिल्यानंतर मुंडन केलेला आणि पांढरे धोतर नेसलेला सुविर्य रत्न विजयजी महाराज सर्वांना पाहायला मिळाला. वर्शीलचे वडील जिगर शाह प्राप्तिकर खात्यात निरीक्षक आहेत. वर्शीलचे कुटुंब आध्यात्मिक आहे. वर्शील आणि त्याच्या बहिणीलाही आध्यात्माची आवड असल्याचे, वर्शीलचे वडील म्हणाले. वर्शीलच्या निर्णयाने पालक काहीसे दु:खी झाले. पण काही काळच. मात्र मुलाच्या आनंदासाठी त्यांनी होकार दिला. वर्शीलने आजपर्यंत आमच्याकडे काही मागितले नव्हते. तो पहिल्यांदाच काही तरी मागत असल्याने आम्ही लगेच संमती दिली, असे त्याचे वडील म्हणाले. (वृत्तसंस्था)आध्यात्मिक वृत्तीशाळेला सुट्टी असताना तो कीर्तनाला जात असे. त्या काळात त्याची अनेक साधू व संन्यासी यांच्याशी ओळख झाली होती. संन्यास स्वीकारण्यापूर्वी त्यापैकी अनेक जण डॉक्टर, इंजिनीअर आणि सीए होते. पण स्वत:च्या आनंदासाठी त्यांनी संन्यास घेतला होता. त्यांचा वर्शीलवर प्रभाव पडला.
बारावीत ९९% गुण घेऊनही संन्यासाकडे
By admin | Published: June 09, 2017 3:43 AM