उंदरावर झडप मारताना सापाचा बालकाला दंश उमाळा येथील बालकाचा मृत्यू : जोगलखेडा येथे खेळताना घडली घटना
By admin | Published: April 13, 2016 12:21 AM
जळगाव: तगारीत पडलेल्या उंदराशी खेळत असताना त्या उंदरावर झडप घालताना करण समाधान जोगी (वय १३ रा.उमाळा ता.जळगाव) या बालकाच्या हाताला सापाने (नागीन) दंश केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता (जोगलखेडा ता.जामनेर) येथे घडली. शवविच्छेदन झाल्यानंतर या बालकावर उमाळा येथे संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळगाव: तगारीत पडलेल्या उंदराशी खेळत असताना त्या उंदरावर झडप घालताना करण समाधान जोगी (वय १३ रा.उमाळा ता.जळगाव) या बालकाच्या हाताला सापाने (नागीन) दंश केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता (जोगलखेडा ता.जामनेर) येथे घडली. शवविच्छेदन झाल्यानंतर या बालकावर उमाळा येथे संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.उमाळा येथील समाधान ओंकार जोगी याचे करण व शंकर हे दोन्ही मुले जोगलखेडा येथे आजोबा लक्ष्मण कडू जोगी यांच्याकडे शिक्षणासाठी गेले होते. करण हा चवथी तर शंकर हा तिसरीत आहे. मंगळवारी दुपारी घरातील ओट्यावर दोन्ही भाऊ व शेजारील तीन मुले खेळत होती. यावेळी तिथे असलेल्या पाणी भरलेल्या तगारीत छपरवरुन उंदीर पडला.या उंदराशी हे सर्व मुले खेळत असतानाच छपरावरुन दबा धरुन बसलेल्या सापाने तगारीतील उंदरावर झडप घातली. त्यात करणच्या हाताला दंश झाल्याने भाऊ शंकर याने धावत जाऊन आजोबा लक्ष्मण जोगी यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने करणला जिल्हा रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. बालकाचे वडील समाधान जोगी, जळगाव बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, तेथे आल्यावर बालकाचा मृत्यू झाल्याचीच बातमी त्यांना मिळाली. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह उमाळा येथे नेण्यात आला.समाधान जोगी हे पत्नी अलका व मुलगी पूनमसह उमाळा येथे राहतात. तर करण व शंकर हे दोन मुले आजोबांकडे जोगलखेडा येथे शिक्षणासाठी गेले होते. समाधान हे मनोहर पाटील यांच्या ट्रॅक्टरवर चालकाचे काम करतात.परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे.