- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने मोठ्या जाहिराती प्रकाशित केल्या. जेणेकरून हे सिद्ध करता येईल की, पटेल यांच्या वारसदारासाठी तेच खरे दावेदार आहेत, तसेच पटेल हे ज्या काँग्रेसमध्ये नेते होते त्या काँग्रेसने त्यांची नेहमीच उपेक्षा केली; पण काँग्रेसने यावर पलटवार करीत एका झटक्यात सरकार आणि भाजपची हवाच काढून टाकली आहे. काँग्रेसने सरदार पटेल यांचे ८ फेब्रुवारी १९४८ चे ते पत्र सार्वजनिक केले आहे जे पटेल यांनी तत्कालीन जनसंघाचे नेते आणि मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिले होते. अर्थात, हे पत्र पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पत्राच्या उत्तरात लिहिले होते.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पटेल यांना पत्र लिहून आपल्या पार्टीचे (हिंदू महासभा) नेते आशुतोष लेहरी, महंत दिग्विजय नाथ आणि देशपांडे यांना तुरुंगातून सोडण्याबाबत आवाहन केले होते. सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्पष्ट शब्दांत लिहिले होते की, या तिघांना सोडणे शक्य नाही. कारण, त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आणि अहवाल आहे. सरदार पटेल हे त्यावेळी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. त्यांनी लिहिले की, बिहारच्या सभेत या नेत्यांनी लोकांना उकसाविण्याचा प्रयत्न केला की, जवाहरलाल नेहरू व मला फाशीवर चढविले जावे. ही घटना महात्मा गांधी यांच्या हत्येच्या पूर्वीची आहे.