नवी दिल्ली : नर्मदेच्या तीरावर सरदार सरोवर धरणानजीक उभारल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वांत अधिक उंचीच्या पुतळ्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ दिल्ली आवृत्तीच्या ११ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर सरदार पटेलांचा हा भव्य पुतळा मेड इन चायना का? भारतात असा पुतळा बनवण्याची क्षमता अथवा शक्यता नाही काय? अशा आशयाच्या प्रश्नांची मालिका ‘लोकमत’च्या वाचकांकडून सुरू झाली. या संबंधात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता हा पुतळा लवकरात लवकर तयार व्हावा, अशी केंद्र सरकारच्या काही अधिकाºयांची इच्छा व त्यासाठी घाई असल्यामुळे, तसेच भारतात इतका भव्य पुतळा बनवण्यासाठी कास्टिंगची इतकी मोठी फौंड्री उपलब्ध होईल की नाही, अशी शंका असल्यामुळे पटेलांचा पुतळा चीनमधे तयार करण्याची योजना ठरली, अशी माहिती हाती आली आहे.वल्लभभाई पटेलांच्या अतिभव्य पुतळ्याचा मूळ आराखडा व संकल्पना शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांची आहे. जगातल्या अनेक पुतळ्यांचे शिल्प सुतारांच्या हस्तकौशल्यातून साकारले आहे मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधे का तयार करावा लागला? याची अधिक माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ने पुतळ्याच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राम सुतारांचे सुपुत्रअनिल सुतारांशीच थेट संपर्कसाधला.‘लोकमत’शी बोलताना अनिल सुतार म्हणाले, ‘पटेलांच्या पुतळ्याची उंची ५२२ फूट आहे. जगातला सर्वाधिक उंचीचा हा पुतळा असल्याने व चार धातूंमध्ये त्याचे कास्टिंग होणार असल्याने इतकी मोठी फौंड्री भारतात उपलब्ध आहे काय? पुतळा बनवायला उशीर तर होणार नाही? या कारणास्तव सरकारी अधिकाºयांनी हा पुतळा चीनमध्ये बनवण्याची सूचना केली. भारतात आम्ही तयार केलेल्या पुतळ्याच्या संकल्पनेनुसार ३0 फुटी पुतळ्याचे थ्रीडी स्कॅनिंग तयार झाले. ते चीनला पाठवण्यात आले.>काय म्हणतात शिल्पकार अनिल सुतार?भारतात हा पुतळा तयार करता आला नसता काय? याचे उत्तर देताना अनिल सुतार म्हणाले, ‘चीनमध्ये भगवान बुद्धांच्या मोठ्या पुतळ्यांच्या कास्टिंगची कामे पूर्वी झाली आहेत. त्यांना या कामाचा अनुभव आहे व तिथे इतका मोठा पुतळा तयार करण्याजोग्या फौंड्रीज उपलब्ध आहेत.
सरदार पटेलांचा पुतळा मेड इन चायना का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 3:49 AM