नवी दिल्ली - गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यामुळे आजपासून हा पुतळा जगभरातील पर्यटकांना पाहता येणार आहे. मात्र, या देशातील पर्यटकांना हा पुतळा पाहणे महागात पडणार आहे. कारण, या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या एंट्री फीपेक्षा सातपट अधिक महाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. पुढील चार वर्षांत लॉर्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा एक असून तो भव्य प्रकल्प आहे. त्यामुळे साहजिकच सर्वगुणसंपन्न असा हा पुतळा पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. मात्र, या पुतळ्याच्या प्रवेशासाठी पर्यटकाला ताजमहालपेक्षा सातपट अधिक पैसे द्यावे लागणार आहे. जगप्रसिद्ध आणि जगातील सातवे आश्चर्य असलेला ताजमहाल पाहण्यासाठी भारतीय नागरिकांना 50 रुपये तिकीट आहे. पण, सरदार सरोवर पूर्णपणे पाहण्यासाठी 350 रुपये मोजावे लागणार आहेत. या परिसरात 15 वर्षांपर्यंतच्या लहानग्यांना 60 रुपयांत तर प्रौढांना 120 रुपयात प्रवेश मिळणार आहे. मात्र, पुतळा तटकिनाऱ्यावर म्हणजेच बोटीतून अगदी जवळ जाऊन पाहण्यासाठी पर्यटकांना 350 रुपये द्यावे लागणार आहेत. ऑनलाईन साईटवरुनही या तिकीटाचे बुकींग करत येणार आहे. मात्र, ताजमहालाच्या तुलनेत नागरिकांना हा पुतळा पाहणे महागात पडणार आहे. सकाळी 9 ते रात्री 6 वाजेपर्यंत पर्यटकांना सरदार सरोवरमध्ये फिरता येईल. दरम्यान, जगात आता, दुसऱ्या स्थानावर चीनच्या स्प्रिंग टेंपलमधील बुद्ध की मूर्तीची गणना करण्यात येईल. या बुद्ध मूर्तीची ऊंची 153 मीटर आहे.