नवी दिल्ली : महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावरील आंतरराष्ट्रीय बंदी उठविण्यासाठी संपूर्ण देशाने तिच्या पाठीशी उभे राहावे, असे भावनिक आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले आहे. यासंदर्भात सचिनने बुधवारी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दीर्घ चर्चा केली.
इंचियोन आशियाडमध्ये रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरलेल्या सरिताने कांस्य स्वीकारण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेद्वारे तिच्यावर आजीवन बंदी घालण्याची चर्चा होत आहे. 6क् किलो वजन गटात सरिताने सेमीफायनल पराभूत झाल्याचा विरोध करीत कांस्य न स्वीकारता ते प्रतिस्पर्धी द. कोरियाच्या खेळाडूच्या गळ्यात टाकले होते.
क्रीडामंत्र्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर माहिती देताना सचिन म्हणाला, ‘सरितादेवी प्रकरणावर आम्ही चर्चा केली. एक खेळाडू म्हणून सरितावर किती आघात झाला याची मला जाणीव आहे. हा तिच्यावरील कठीण प्रसंग असावा. अशावेळी प्रत्येकाची विरोधाची भाषा वेगळी असते. आयबाने तिच्याबाबत विचार करावा. सरिताने विश्व संस्थेकडे माफीनामा दिला आहे. आयबाकडे आता कुठली मागणी कुठल्या स्वरूपात करावी, यावर मी क्रीडामंत्र्यांशी सल्लामसलत केली.(वृत्तसंस्था)
संपूर्ण देशाने सरिताच्या पाठीशी भक्कमपणो उभे राहावे, असे मी आवाहन करतो. सरिताचे करिअर वाचवायचे झाल्यास हे आवश्यक आहे. बॉक्सिंग इंडिया, क्रीडा मंत्रलयाचा पाठिंबा आहेच. आम्हाला योग्य दिशेने मागणी करावी लागेल.
- सचिन तेंडुलकर