बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव आता पुन्हा एकदा समोर आलं आहे. देशात बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की पीएचडी आणि एमटेक केलेले उमेदवारही बारावी उत्तीर्ण नोकरीसाठी अर्ज करत आहेत. आंध्र प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एपी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यात आली होती, ज्यांची शैक्षणिक पात्रता 12 वी आहे. परंतु पीएचडी, एमबीए, एमएससी, एलएलबी आणि एमटेक केलेल्या उमेदवारांनीही या भरतीसाठी अर्ज केले आहेत.
APSLPRB ने 3,580 (पुरुष आणि महिला) स्टायपेंडरी कॅडेट ट्रेनी (SCT) पोलीस कॉन्स्टेबल आणि 2,520 (पुरुष) SCT पोलीस कॉन्स्टेबल (AP स्पेशल पोलीस) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. या भरतीसाठी पाच लाखांहून अधिक (एकूण 5,03,486) उमेदवारांनी अर्ज केले आहेत, ज्यात 3,95,415 पुरुष आणि 1,08,071 महिलांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल भरतीची लेखी परीक्षा रविवारी होणार आहे.
भरतीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये 10 PhD धारक आणि 930 MTech, 5,284 MBA, 4,365 MSc आणि 94 LLB पदवीधारकांचा समावेश आहे. एकूण, 6,400 कॉन्स्टेबल पदांसाठी सरकारी नोकऱ्यांसाठी एकूण 5,03,486 अर्जदारांपैकी 13,961 पदव्युत्तर आणि 1,55,537 पदवीधर आहेत.
राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळाच्या अधिकृत सूचनेनुसार, कॉन्स्टेबल पदासाठीची पात्रता इंटरमीडिएट आहे. 3.64 लाखांहून अधिक अर्जदारांनी लेखी परीक्षेचे माध्यम म्हणून तेलुगू निवडले आहे, तर 1.39 लाखांहून अधिक लोकांनी इंग्रजी आणि 227 जणांनी उर्दू माध्यम निवडले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"