रायपूर : छत्तीसगडमधील सर्वात तरुण सरपंच बनण्याचा मान मिळालेली रितू पंदराम सध्या विकास कामांद्वारे गावकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी परिश्रम करीत आहे. गरीब मुलांना नि:शुक्ल शिकवणीची सोय व सरकारी योजना खेचून आणण्यास पाठपुरावा करून तिने चुणूक दाखवली असून, गावकरी तिच्या कामावर खुश आहेत. गावच्या विकासासाठी झटताना ती ‘आयएएस’ अधिकारी बनण्याचे स्वत:चे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठीही तेवढ्याच तन्मयतेने प्रयत्न करीत आहे. सारबहारा गावची ही तरुण सरपंच गावातील पाणीटंचाई आणि स्वच्छतेसारखे मुद्दे सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करीत आहे. गावात पाणी, वीज आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यास ग्रामस्थांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येईल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे त्यांनी सांगितले. सारबहाराची नऊ हजार लोकसंख्या आहे. गावातील बहुतांश लोक आदिवासी आहेत. रितू बिलासपूर येथील गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठात जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून, नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे तिचे ध्येय आहे. तिचे हे ध्येय ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या आड आले नाही. २०१५ मध्ये निवडणूक जिंकून राज्यातील सर्वात तरुण सरपंच बनण्याचा मान तिने पटकावला. निवडणुकीनंतर तिने शिक्षण सुरूच ठेवले. कॉलेजमधील माझे मित्र मला नेताजी म्हणून हाक मारत. राजकारण हा माझा प्रांत नसल्यामुळे आपण निवडणूक लढवू असा कधी विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता. आता माझ्या गावातील लोक मीच सर्वात योग्य असल्याचे म्हणतात. रितूचे वडील उदयसिंह पंदराम शेतकरी आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वच्छता, रस्ते बांधण्यावर दिला भरसरपंच झाल्यापासून रितूने गावच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. स्वच्छता ठेवणे आणि रस्ते बांधण्यावर तिने भर दिला. आमच्या गावात १२ वी पर्यंत सरकारी शाळा व एक निमसरकारी आदर्श शाळा आहे. तथापि, विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानातील मूलभूत गोष्टी समजाव्यात यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. माझ्या नि:शुल्क शिकवणी वर्गात गेल्यावर्षी १२ ते १३ मुले होती. यावर्षी ही संख्या ३० वर गेली आहे.
सरपंच तरुणीने बदलला गावाचा चेहरामोहरा!
By admin | Published: September 03, 2016 3:00 AM