सरपंच- ग्रामसेवकांसह पाणी चोरी प्रकरणी गुन्हा
By admin | Published: April 25, 2015 2:10 AM
पाचोड : जायकवाडी पैठण ते जालना पाणी पुरवठा योजनेच्या इयर वॉल्समधून पाण्याची चोरी करणार्या लिंबगाव थेरगाव, दादेगाव व दावरवाडी येथील आकरा जणांवर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दादेगाव व दावरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवकांचा समावेश आहे.
पाचोड : जायकवाडी पैठण ते जालना पाणी पुरवठा योजनेच्या इयर वॉल्समधून पाण्याची चोरी करणार्या लिंबगाव थेरगाव, दादेगाव व दावरवाडी येथील आकरा जणांवर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दादेगाव व दावरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवकांचा समावेश आहे.जालना शहराला दरवर्षी सात ते आठ महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने पैठण ते जालना पाईपलाईन टाकून जायकवाडी धरणातील पाणी जालना शहराला पुरवठा केला जात आहे. या पाईपलाईनमध्ये विविध ठिकाणी इयर वॉल्स बसविलेआहेत. पाचोड ते पैठणपर्यंत असलेल्या या पाईपलाईनच्या इयर वॉल्समधून काही जण पाण्याची चोरी करीत असल्याचे अधिकार्यांच्या लक्षात आले. मार्च २०१३ पासून आजपर्यंत पाण्याची चोरी होत असल्यामुळे जालना शहराला होणारा पाणी पुरवठा कमी होत असल्यामुळे या ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे.या घटनेमुळे जालना नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजाारी यांनी जालना ते पैठण पर्यंत ठिकठिकाणी थांबवून दौरा करून पाहणी केली व त्यांनी पाणी पुरवठा अभियंता यांना या प्रकरणी पंचनामे करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.जालना नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता राजेश बगला यांनी पंचनामे करून गुरुवारी रात्री उशिरा पाचोड पोलिस ठाण्याला येऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बबन कर्डिले (रा. लिंबगाव) कडू विठू थोट (रा. दादेगाव फाटा), भीमा काळे (दावरवाडी) ग्रामपंचायत दादेगावचे सरपंच व ग्रामसेवक विठ्ठल हजारे, विजय हजारे (रा. दादेगाव) ग्रामपंचायत दावरवाडीचे सरपंच व ग्रामसेवक, पेरू वाहेद शेख, रा. थेरगाव, शेख बाबू गुलाब (रा. थेरगाव) शेख रशीद गुलाब (रा. थेरगाव) विनायक गोलांडे व एकनाथ कोल्हे (रा. थेरगाव) यांच्या विरोधात पाणी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास स.पो.नि. भगवान धबडगे करीत आहेत.