भुवनेश्वर - गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे. गेल्या 62 वर्षांपासून सुरू असलेल्या वादामुळे या गावात चक्क दोन राज्यांचे सरपंच बसतात. हा गाव ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. ओदिशातील कोरापूट जिल्ह्यात येणाऱ्या या गावाचे नाव कोटिया असे आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आज या गावाचा दौरा करणार आहे. तसेच ओदिशा सरकार आपल्या अधिकाऱ्यांचे एक पथक कोरापूट जिल्ह्यातील या गावात पाठवून आंध्र प्रदेशकडून करण्यात आलेल्या तथाकथित घुसखोरीचा तपास करणार आहेत. कोटिया ग्रामपंचायतीमध्ये एकूण 28 गाव असून त्यापैकी 21 गाव 1956 पासून ओदिशा आणि आंध्र प्रदेशमधील वादाचे केंद्र बनलेले आहे. या गावातील दाहूर खारा नावाच्या ग्रामस्थाने सांगितले की, हा विवादित भाग आहे. आम्ही ओदिशा आणि आंध्र प्रदेश दोन्ही ठिकाणी मतदान करतो. आमच्या गावात दोन सरपंच आहेत. ज्यामध्ये ओदिशाकडून विश्वनाथ खिला आणि आंध्र प्रदेशकडून बिसू जेमेल सरपंच आहेत.
या गावात बसतात चक्क दोन राज्यांचे सरपंच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 9:19 AM