जयपूर : पित्याच्या निधनानंतर त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला देणाऱ्या पुत्राची मृत्यू प्रमाणपत्रासाठी प्रचंड ससेहोलपट होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून ते जयपूर महापालिका कार्यालयात खेटे घालत आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडते आहे.अंत्यसंस्कार झाल्याची नोंद नसल्याने त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्काराचा रेकॉर्ड नगरपालिका कार्यालयात पोहोचल्यावर मृत्यूचे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु पीडित व्यक्तीच्या वडिलांचे अंत्यसंस्कार झाले नसल्याने ही समस्या निर्माण झाली असून, पालिकेने त्यांना मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय दिनेश अग्रवाल यांनी त्यांचे वडील नंदलाल भूत यांच्या निधनानंतर त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार वैद्यकीय महाविद्यालयात देहदान केले. पालिकेच्या २०१४च्या परिपत्रकानुसार शैक्षणिक अथवा संशोधनासाठी वैद्यकीय महाविद्यालयास एखाद्या व्यक्तीचा देहदान करण्यात आल्यास त्याच्या मृत्यू प्रमाणपत्राकरिता घाटावरील अंत्यसंस्काराच्या कागदपत्रांची गरज नाही. तरीही अग्रवाल यांना मृत्यू प्रमाणपत्रासाठी जेएमसी कार्यालयात एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे याचना करीत फिरावे लागत असून, याबद्दल जनमानसात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)दाखला देणे आवश्यक वैद्यकीय महाविद्यालयाने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारेच देहदान करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाइकांना तातडीने मृत्यूचा दाखला देणे आवश्यक आहे.
देहदान करणाऱ्याच्या वारसाची मृत्यूच्या दाखल्यासाठी ससेहोलपट
By admin | Published: June 26, 2016 2:15 AM