हरीश गुप्ता,
नवी दिल्ली/चेन्नई- राज्यसभेतील अद्रमुक सदस्य एम. शशीकला पुष्पा यांची पक्षाध्यक्ष जयललिता यांनी सोमवारी पक्षातून हकालपट्टी केली. काही दिवसांपूर्वी त्यांची दिल्ली विमानतळावर एका द्रमुख खासदारासोबत हाणामारी झाली होती. या घटनेमुळे पक्षाची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत जयललिता यांनी शशीकला यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांचा राजीनामा फॅक्सने राज्यसभा सचिवालयाकडे पोहोचला असला तरी शहानिशा न झाल्याने तो स्वीकारण्यात आलेला नाही.तथापि, आपल्या हकालपट्टीचा विमानतळावरील घटनेशी संबंध नसल्याचे सांगून शशीकला यांनी राजीनाम्यासाठी दोन महिन्यांपासून आपल्यावर दबाव आणण्यात येत होता, असे राज्यसभेत सांगितले. निवेदन करताना अनेकदा त्यांचा कंठ दाटून आला होता. मला आमच्या नेत्याने मारले, असे सांगताना तर त्या रडवेल्या झाल्या होत्या. मात्र, अण्णा द्रमुकच्या नेत्याचे त्यांनी नाव उच्चारले नाही. शशीकला यांनी पक्षाचे सिद्धांत आणि मूल्यांचे उल्लंघन केले असल्यामुळे त्यांना सर्व पदांवरून हटविण्यासह, सदस्यत्वातूनही मुक्त करण्यात येत असल्याचे जयललिता यांनी म्हटले आहे. >जिवाला धोकासभागृहात निवेदन करताना शशीकला म्हणाल्या की, एका नेत्याने आपल्या श्रीमुखात भडकावली होती. राज्य सरकारकडून आपल्या जिवाला धोका असून, राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, यासाठी आपल्यावर दबाव आणला जात आहे. शशीकला शून्य प्रहरात आपले म्हणणे मांडू इच्छित होत्या. त्यासाठी त्या सभापतींच्या आसनाजवळ गेल्या. त्यानंतर, बोलताना त्यांना अनेकदा रडूच कोसळले.