ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीवर काम करत असून, या इंजिनमध्ये पर्यावरणपूरक रॉकेलचा इंधन म्हणून वापर करण्यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. द्रवरुप इंधनापेक्षा रॉकेल हलके असल्यामुळे सामान्य तापमानाला ते साठवून ठेवता येऊ शकते. सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणा-या रॉकेटच्या इंजिनमध्ये द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो.
हे इंधन गोठवून टाकणा-या (-253) डीग्री सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे लागते. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे जुळून आले तर, इस्त्रो 2021 मध्ये रॉकेलच्या सहाय्याने सेमी क्रायोजेनिक इंजिनची चाचणी करु शकते. पारंपारिक हायड्रोजन, ऑक्सिजन इंधनापेक्षा रॉकेल हलके आहे. क्रायोजेनिक इंजिनाच्या वापरामुळे रॉकेटमधील पेलोडची क्षमता चार ते सहा टनांनी वाढेल. सेमी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या रॉकेटने अवजड उपग्रह प्रक्षेपित करता येऊ शकतात.
अमेरिका, रशिया या देशांच्या अवकाश संशोधन संस्था सेमी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या विविध चाचण्या सुरु आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2008 सालीच सेमी क्रायोजेनिक इंजिनाच्या प्रोजेक्टरला मंजुरी दिली होती. 1,798 कोटी या प्रोजेक्टला खर्च अपेक्षित असून, 2014 मध्ये या इंजिनाची चाचणी होणार होती. पण या प्रोजेक्टला विलंब झाला आहे.
आणखी वाचा
पाच जूनला भारताने GSLV मार्क-3 या प्रक्षेपकाव्दारे अवकाश संशोधनात वजनदार यश मिळवले. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. जीसॅट-19 या उपग्रहामुळे भारतातील इंटनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. जीएसएलव्ही मार्क -3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत अंतराळ संशोधनामध्ये अधिक सक्षम झाला आहे.
आता भारताला वजनदार उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच चार टनांहून जास्त वजनाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणे भारताला शक्य होणार आहे. तसेच स्वत: अंतराळ मोहीम हातात घेऊन अंतराळवीर अंतराळात पाठवणे इस्रोच्या टप्प्यात आले आहे. गेली 30 वर्षे भारताची आंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जास्त वेगाचे क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यासाठी प्रयत्नशील होती.
अखेर 30 वर्षांच्या संशोधनानंतर आज इस्त्रोला हे वजनदार यश मिळाले आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची उपग्रह प्रक्षेपण क्षमता दुप्पट होणार आहे. याआधी इस्रोची प्रक्षेपण क्षमता 2.2 टन ते 2.3 टन होती. जीएसएलव्ही मार्क -3 च्या यशामुळे हीच क्षमता 3.5 ते 4 टन म्हणजे दुप्पट होणार आहे. एकेकाळी भारताला अवकाशात सोडावे लागणारे जड वजनाचे उपग्रह अमेरिकेतील नासा किंवा रशियाची रॉस्कॉसमॉस अशा बड्या संस्थांच्या मदतीने अवकाशात सोडावे लागत कारण तेवढ्या ताकदीचे अग्णिबाण भारताकडे नव्हते.
भारताला ते तंत्रज्ञान मिळू नये म्हणून अमेरिका आणि रशियाने यातही अडथळे आणले. क्रायजेनिक इंजिन असलेल्या अग्निबाणाच्या साहाय्याने जड वजनाचे उपग्रह भारताला प्रक्षेपित करता येऊ नयेत आणि या इंडट्रीवरचे आपले वर्चस्व अबाधित राहावे, हा अमेरिका आणि रशियाचा कारस्थानी उद्योग भारतीय संशोधकांनी मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने मोडीत काढला. हे सारे तंत्रज्ञान भारतानेच स्वयंस्फूर्तीने विकसित केले.