- संकेत सातोपे
मुंबई - केशरी रंगाच्या नारळ लागवडीवर केरळ शासनाने कायमची बंदी घातल्याचे कळते. इतकेच नव्हे, तर जिथे जिथे हे केशरी नारळ दिसतील तिथून ते मुळासकट उपटून 'लाल' मातीत पुरून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांत देशभरात या केशरी नारळांचे बेसुमार पीक आल्यामुळे अन्य प्रजातींचे उत्पादक कमालीचे चिंतेत आहेत. त्यातच केशरी नारळ लागवडीसाठी अत्यंत अयोग्य असलेल्या ईशान्य भारतातील मातीतही अलीकडे हे केशरी माड रुजू लागल्याने त्यांच्या चिंतते भर पडली आहे. तुलनेने कमी पाण्यात अधिक आणि झटपट उत्पन्न देणारे हे केशरी पीक देशात सर्वांकडूनच स्वीकारले गेल्यास अन्य वाण नामशेष होण्याची भीती आहे. जीर्ण वडाच्या पारंब्या पाराचे भक्कम बांधकामही फोडत जातात, त्याच थाटात ईशान्येत काल उगवलेल्या या केशरी माडांच्या कोवळ्या मुळांनी चक्क भले मोठे पुतळे कलथून टाकण्यास प्रारंभ केला.
त्यामुळे वरपांगी आकर्षक दिसणारे, हे घातकी माड निदान केरळच्या लाल भडक मातीत तरी फोफावू नयेत, यासाठी आतापासूनच विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या केशरी प्रजातीला पोषक ठरणाऱ्या आणि कोणत्याही खतपाण्याविना केवळ श्रमदानातून कुठेही उगवणाऱ्या खाकी वनस्पतीही मुळासकट नष्ट करून टाकण्याच्या गुप्त सूचना श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे कळते. तसेच गेली अनेक वर्षे सातत्याने या वनस्पतींची तोड करूनही, कातळावरील निवडुंगासारख्या त्या पुन्हा-पुन्हा उगविण्याची कारणे शोधण्यासाठी विशेष समितीही नेमण्यात आली आहे.
(सूचना - हे कृषीवृत्त असून याचा राजकीय सद्यस्थितीशी कोणताही संबंध नाही; असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)