कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:46 PM2023-05-12T12:46:23+5:302023-05-12T12:47:02+5:30
२०१८ च्या निवडणुकीत सट्टाबाजाराचा अंदाज चुकलेला... यंदा खरा ठरणार? सट्टेबाजांचे पैसे बुडालेले...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्यावर येऊन ठेपला आहे. २२४ जागांच्या या निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत, तर सत्ताधारी भाजपाची सत्ता जाताना दिसत आहे. हा सगळा खेळ मतदार राजा करणार आहे. यंदा गेल्या वेळेपेक्षा दोन टक्के जास्तीचे म्हणजेच एकूण 72.67 टक्के मतदान झाले आहे. यामुळे कर्नाटक निवडणुकीवर सट्टाबाजारानेही वेग घेतला आहे.
कर्नाटकात, मंड्या जिल्ह्यातील मेलुकोट विधानसभेच्या जागेवर सर्वाधिक 90.93 टक्के मतदान झाले, तर बेंगळुरूमधील सीव्ही रमण नगर मतदारसंघात सर्वात कमी 47.43 टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी २०१८ च्या निवडणुकीत सट्टा बाजारात भाजपावर मजबूत पैसे लागले होते. परंतू, सर्वांचे पैसे डुबले होते. कारण काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या व जेडीएससोबत मिळून सत्ता स्थापन झाली होती. नंतरच्या सत्तेच्या राजकारणात भाजपाने हे सरकार पाडले आणि आपले सरकार स्थापन केले.
कर्नाटकच्या यंद्याच्या निवडणुकीत सट्टेबाजांनी भाजपावर नाही तर काँग्रेसवर पैसा लावला आहे. सट्टेबाजांनुसार भाजपाला ८०, जेडीएसला ३७ जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निकालावर जे बुकी सट्टा घेत आहेत त्यांच्यानुसार काँग्रेसला १२० ते १३० जागा मिळण्याची शक्यता आहे.
हापुरमधील एका सुत्राने आएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, काँग्रेसला ११० जागा, भाजपाला जास्तीतजास्त ७५ जागा मिळण्याची शक्यता आहे. फलोदी सट्टा बाजाराशी संबंधित लोकांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाला १३७ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला केवळ ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. जनता दलाला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे.
पालनपूर सट्टा बाजारानुसार, काँग्रेसला 141 जागा मिळतील, तर भाजपला 57 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जेडीएसला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे.