जोधपूर: गेल्या अनेक दिवसांपासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. तसेच कृषी कायद्यासह अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर मलिक सातत्याने निशाणा साधतानाही दिसत आहेत. अशातच आता जोधपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना थेट टक्कर देऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, ते त्यांना पटवून देण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करू शकतात. केंद्राने शेतकऱ्यांशी लढा देऊ नये. ते धोकादायक लोक आहेत, असा माझा दिल्लीला सल्ला आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना हवे ते मिळेल. चर्चेतून मार्ग निघाला नाही, तर ते मोठा लढा देतील आणि लढ्यातूनही काही निष्पन्न झाले नाही तर ते हिंसाचारही करतील, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले.
दिल्लीहून फोन येऊ शकतो
केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात सुमारे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांची तोंडे बंद करता येणार नाहीत. आपल्या मागण्या कशा पूर्ण करायच्या हे त्यांना बरोबर माहिती आहे. या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करणार, तसे झाल्यास 'दिल्लीहून फोन' येऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी सूचित केले. यानंतर बोलताना मलिक म्हणाले की, मी दिल्लीत दीड खोलीच्या घरात राहतो. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींना आव्हान देऊ शकतो. यापूर्वीही जेव्हा सत्यपाल मलिक पंतप्रधानांना भेटले होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अवघ्या पाच मिनिटात भांडण झाले होते.
दरम्यान, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या हत्येचा संदर्भात बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले की, मी त्यांना सांगितले की, शीख आणि जाट काहीही विसरत नाहीत. तुम्ही त्यांना काहीतरी देऊन पाठवावे. त्यांना इंदिराजींचीही आठवण सांगितली होती, असे ते म्हणाले. जोधपूरमध्ये मारवाड जाट महासभेच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सत्यपाल मलिक उपस्थित होते.