जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे समजून घेतले पाहिजे की सत्ता कायमस्वरूपी नसते आणि ती येत-जात असते, असे मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी रविवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना सत्यपाल मलिक म्हणाले की, "मोदीजींनी हे समजून घेतले पाहिजे की सत्तेची पॉवर येते आणि जाते. इंदिरा गांधी यांचीही सत्ता गेली. तेव्हा लोक म्हणायचे की त्यांना कोणीही हटवू शकत नाही. एक दिवस तुम्हीही निघून जाल, त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडवू नका की, ती सुधारता येणार नाही."
सत्यपाल मलिक रविवारी जयपूरमध्ये राजस्थान युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या (RUSU) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, "देशात अनेक प्रकारच्या लढाया सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन केल्यास केंद्र सरकारच्या विरोधात युवकही मोर्चा काढतील." यासोबतच, सत्यपाल मलिक यांनी सैनिक भरतीसाठी राबविल्या जाणाऱ्या 'अग्निपथ' योजनेवरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या योजनेमुळे सैन्य कमकुवत होऊ शकते आणि केवळ तीन वर्षे सेवा बजावताना सैनिकांमध्ये त्यागाची भावना राहणार नाही, असे ते म्हणाले.
सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, जितके आपल्या माहिती आहे. त्यानुसार अग्निवीर सैनिकांना ब्रह्मोससह इतर क्षेपणास्त्रांना आणि शस्त्रांना स्पर्श करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे 'अग्निपथ' योजनेमुळे लष्कराचीही नासधूस होत आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान, सत्यपाल मलिक ज्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्या कार्यक्रमात निर्मल चौधरी यांनी राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद स्वीकारले. ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.