ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - नागरिकांना ‘आधार’ कार्ड जारी करणाऱ्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडिया’चे (यूआयडीएआय) अर्धवेळ अध्यक्ष म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (अायएएस) निवृत्त अधिकारी जे. सत्यनारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सत्यनारायण यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली, असे मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. याखेरीज राजेश जैन आणि आनंद देशपांडे यांची या प्राधिकरणावर अर्धवेळ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
सत्यनारायण आंध्र प्रदेश कॅडरचे सनदी अधिकारी होते. निवृत्त होण्यापूर्वी दोन वर्षं ते इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव होते. ई-गव्हर्नन्सचा त्यांना दांडगा अनुभव आहे. मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले जैन ‘नेटकोअर सोल्युशन्स’ या एंटरप्राईज कम्युनिकेशन व डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आहेत.-------------देशपांडे ‘लोकमत’च्या ‘मोती’ पुरस्काराचे मानकरीडॉ. आनंद देशपांडे हे दै. लोकमतच्या यंदाच्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराचे व्यापार प्रवर्गातील मानकरी आहेत. आयआयटी खरगपूरमधून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या विषयांत बी. टेक. पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी. केली. आपल्या ज्ञानाचा मायभूमीला उपयोग व्हावा या विचाराने डॉ. देशपांडे भारतात परतले व त्यांनी १९९० मध्ये ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’ ही कंपनी स्थापन केली. ते पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. सॉफ्टवेअर आऊटसोर्सिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल १,५०० कोटी रुपयांची असून तीन खंडांमधील कार्यालयांत कंपनीचे चार हजारांवर कर्मचारी आहेत.